Monday, January 10, 2022

शहरात तगडे मल्ल घडवणारे कुस्ती कोच संपत्ती येळकर


महाराष्ट्रात कुस्ती एखादे म्हटले कि डोळ्यासमोर येते कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर. मुंबईत पूर्वी सर्वात जास्त कुस्ती आखाडे होते, पण आता २-४ अपवाद वगळता कुस्ती आखाडे बंद झाले. मुंबई परिसरात आखाडे बंद होत असताना, नवी मुंबईसारख्या एका मोठ्या शहरात  नवी मुंबई पोलीस मुख्यालय-कुस्ती आखाडा, रोड पाली,  कळंबोली येथे एक सुखावह चित्र दिसत आहे. या आखाड्यात ९० च्या आसपास पोलीस पाल्य आणि गोरगरीब लोकांची मुले कुस्तीचे धडे घेत आहेत. त्यात आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे १२ मुली कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत. शहरातील लोक कुस्ती या खेळाकडे किती आपुलकीने पाहात आहेत, त्याचे हे उदाहरण आहे. या सर्व मुलांना एकत्र आणून त्यांना योग्य प्रक्षिशण आणि मार्गदर्शन करत आहेत संपत्ती मधुकर येळकर. मूळचे तुपडी, ता. निलंगा, जि. बीड येथील असलेले संपत्ती येळकर  हे पोलीस दलात असून ते  एन.आय.एस. कोच आहेत.  १९९३ ते १९९५ शालेय कुस्ती स्पर्धेमधून त्यांनी सहभाग घेऊन १९९७ मध्ये त्यांनी सुर्वपदक जिंकले. १९९८ ला ऑल इंडिया गेम मध्ये त्यांनी सहभाग घेतला. पोलीस दलात आल्यावर या खेळाशी काही देणे लागते यातुन पोलीस मुख्यालयातील आखाड्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली. त्यासाठी त्यांचा दिवस पहाटे ४ वाजता सुरु होतो आणि रात्री १२ ला संपतो. लहान मोठ्या वजनी गटातील मुलांना  पोलीस मुख्यालय-कुस्ती आखाडा मध्ये दररोज न चुकता ते व त्यांचे सहकारी कोच प्रशिक्षण देत असतात. २०१८ ला मॅटचा आखाडा सुरु झाला, आणि २०२० मध्ये मातीचा आखाडा त्यांनी सुरु केला. प्रशिक्षण देण्यासाठी  त्यांना पोलीस दलातील त्यांचे सहकारी सरदार नाळे (डीवायएसपी), नामदेव भेलके, प्रदीप जाधव (चिंचोली) यांचे सहकार्य लाभते. तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू नामदेव बडरे, धीरज पांगारकर आणि संजय चव्हाण या कुस्तीमधील प्रशिक्षक मंडळींचे खूप मार्गदर्शन मिळत आहे. आता कुस्तीबरोबर याठिकाणी पोलीस पाल्यासाठी किक बॉक्सिंग, बास्केट बॉल, फुटबॉल व  तायकांदो खेळ सुरु केले आहेत. या सर्वाना एन.आय एस. कोच  प्रशिक्षण देत आहेत. कोणतेही  शुल्क न आकारात पोलीस पाल्य आणि नवी मुंबई परिसरातील गोरगरीब जनतेसाठी कुस्ती आणि हे सर्व खेळ ते शिकवीत आहेत. या कुस्ती आखाड्याला आतापर्यंत कुस्तीतील नामवंत अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आणि अमृता भोसले यांनी भेट देऊन शहरात कुस्तीचे एवढेच मोठे काम सुरु आहे त्याचे कौतुक केले आहे.  महाराष्ट्र पोलिसांनी दखल घ्यावे असे पैलवान या आखाड्यात घडत आहे. पोलीस महासंचालक आणि महाराष्ट्र शासनाच्या गृहखात्याने नक्की पाहावे असे काम नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.
हरिशचंद्र बिराजदार मामा यांचा सहवास लाभलेले येळकर यांना पोलीस पाल्याने ऑलीम्पिक मेडल आणावे हा ध्यास आहे. ते त्यांच्याशी बोलताना पदोपदी जाणवते. पोलीस पाल्य सर्व खेळामध्ये आघाडीवर असला पाहिजे तो सदृढ असला पाहिजे, पुढची पिढी चांगली घडली पाहिजे हा एकमेव ध्यास  घेतलेले येलकर याना नवी मुंबई पोलीस वरिष्ठांकडून खूप सहकार्य लाभते. यावेळी बोलताना संपत्ती येळकर यांनी सांगितले कि, या  कुस्ती आखाड्यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंहजी, पोलीस सहआयुक्त डॉ. जय जाधव, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय श्री. अभिजीत शिवथरे व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन मंदार नाईक या सर्वांचे खुप सहकार्य लाभत आहे.
दत्तात्रय जाधव (कुस्ती संघटक)




 

1 comment:

  1. कुस्ती खेळासाठी अशी प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी केल्याने महाराष्ट्रात पैलवानांना बाळ मिळेल, आणि कॉचेस आणि वस्ताद यांचंही नावलौकिक झाल्याने जोमाने प्रशिक्षण देतील आणि कुस्ती मल्ल तयार होतील धन्यवाद जाधव सर खूप मोठं कार्य आपल्या हातून होतं त्याबद्दल मी आपले खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो👏🚩

    ReplyDelete