Monday, January 30, 2023

मातीतल्या कुस्तीची ऑलीम्पिककडे वाटचाल..  युनायटेट वर्ल्ड रेसलिंग संघटनेची मातीच्या कुस्तीला मान्यता.. 


मातीतल्या कुस्तीची ऑलीम्पिककडे वाटचाल.. 
युनायटेट वर्ल्ड रेसलिंग संघटनेची मातीच्या कुस्तीला मान्यता.. 

भारतातील प्राचीन इतिहास आणि त्या अगोदरपासून हजारो वर्षांपासून कुस्ती हा खेळ भारतात खेळला जातो. इथे पूर्वीपासून मातीतील कुस्तीला राजमान्यता आणि लोकाश्रय आहे. मातीतील खूप जुनी संघटना भारतीय कुस्ती महासंघ (भारतीय शैली) यांनी जवळपास ६०-६५ वर्षे हि संघटना आणि लाल मातीतील कुस्ती टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी खूप कष्ट घेतले. आतापर्यन्त जेवढे हिंदकेसरी, भारत केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत भीम असे अनेक मानाचे किताब या संघटनेने दिले. मातीतील हीच संघटना अधिकृत आहे हे दिल्ली हायकोर्टने सिद्ध केले. बऱ्याच कुस्तीतील काही प्रवृत्तीनी सत्ता, पैसे याच्या जोरावर भारतीय शैली कुस्ती महासंघ याना त्रास देण्याचा प्रयत्न केला पण गौरव सचदेवा, रामाश्रय यादव, नफेसिह राठी यांच्या टीमने कोर्टाच्या माध्यमातून अशा खेळात घुसलेल्या वाईट प्रवृत्तीना जशास तसे उत्तर दिले. 
मातीतील कुस्ती आता जगभरात खेळली जाणार आहे आणि तीसुद्धा युनायटेट वर्ल्ड रेसलिंग संघटनेच्या मान्यतेने. हैद्राबाद येथे झालेल्या ५१ व्या हिंदकेसरी स्पर्धेवेळी UWW असोसिएटेड स्टाइल्सच्या अध्यक्षा आणि ब्यूरो सदस्य रॉडिका यॅक्सी यांनी यावेळी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून भारतीय शैली कुस्तीला युनायटेट वर्ल्ड रेसलिंग संघटनेने मान्यता दिली असून हा मातीतील खेळाचा जगभरात प्रसार होणार आहे. भारतासाठी खरेच हि अभिमानाची बाब आणि एक मोठी संधी आहे. आपली खरी ओळख हि मातीतील कुस्ती आहे आणि मातीतल्या स्पर्धा आता जागतिक पातळीवर होतील आणि त्याचा फायदा इथल्या खेळाडूंना होईल. तसेच भारतातील प्रशिक्षक याना जगभरातील वेगवेगळ्या देशात तिथल्या खेळाडूंना शिकविण्यासाठी संधी निर्माण होतील. याचा जास्त फायदा हा भारतातील पैलवान आणि इथल्या प्रशिक्षक लोकांना होणार आहे.  

महाराष्ट्राने या संधीचे सोने करावे 
युनायटेट वर्ल्ड रेसलिंग संघटनेची मान्यता मिळाल्यानंतर महाराष्ट्रात एक चांगली संघटना तयार होणे गरजेचे आहे. दोन गटात सुरु असलेले राजकारण यामुळे महाराष्ट्राच्या कुस्तीत नेहमी वाद सुरु आहेत. या दोन गटापासून अलिप्त अशी एक मातीतील संघटना इथे होणे गरजेचे आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघ यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात आपली पाळेमुळे रोवली पाहिजे. रामाश्रय यादव, गौरव सचदेवा यांच्या टीमने या २ राज्याकडे खूप लक्ष दिले पाहिजे. कारण या दोन्ही राज्यात मातीच्या कुस्तीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. आणि इथे सर्वात जास्त पैसा हा कुस्ती खेळावर खर्च केला जातो. त्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र या संघटनेची त्यांनी बांधणी केली पाहिजे. मोहन खोपडे यांच्यासारखा एक धडपड्या सतत कुस्तीसाठी झटणारा सचिव चांगले काम करत आहे. अधिकृत संघटना घोषणा करून UWW  च्या आणि भारतीय शैली महासंघाच्या मान्यतेने मोठ्या स्पर्धा महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यात झाल्या पाहिजेत. 

द्रोणाचार्य अवार्ड स्व. रोशनलालजी सचदेवा सर यांचे स्वप्न पूर्ण 
गेली ६-७ दशके स्व. रोशनलालजी आणि त्यांच्या टीमने हि कुस्ती टिकविण्यासाठी तसेच मातीतील स्पर्धा हिंदकेसरी, भारत केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत भीम अशा अनेक मोठ्या स्पर्धा त्यांनी घेण्यासाठी खूप कष्ट घेतले. त्यांच्या जोडीला रामाश्रय यादव, गौरव सचदेवा व भारतीय शैली कुस्ती महासंघ यांच्या टीमने बरीच वर्षे  केला. युनायटेट वर्ल्ड रेसलिंग संघटनेची मान्यता मातीतल्या कुस्तीला मिळवून भारतीय शैली कुस्ती महासंघाने  रोशनलालजी यांना खरी श्रध्दांजली वाहिली आहे.

दुसऱ्या संघटनेची दादागिरी इथून पुढे बंद होईल 
मातीतल्या कुस्तीला खूप मोठा अडसर दुसऱ्या कुस्तीतील  संघटनेचा होता. बऱ्याच लोकांनी भारतीय शैली कुस्ती प्रकाराला मान्यता मिळू नये तसेच त्यांच्या संघटनेला मान्यता मिळावी म्हणून बरेच प्रयत्न केले. पण UWW ने सर्व अभ्यास करून भारतीय कुस्ती शैली महासंघाशी करार केला. ज्यावेळी बजरंग पुनिया आणि इतर खेळाडूंनी ब्रजभूषण आणि त्यांच्या संघटनेवर आरोप केले तेव्हा जगभरातील वृत्तपत्रांनी या बातमीची दखल घेतली. यामुळे या खेळाची बदनामी झाली. कुस्तीच्या जीवावर एका सचिवाने करोडो रुपयाची माया जमविली हे खेळाडूंनी टीव्हीवर सांगितले. या आरोपांची निपक्ष चौकशी होऊन नवीन चांगले खेळाडू टीम या संघटनेवर पाहिजे. एका राज्याचे जास्त लोक असले कि ते फक्त आपल्या खेळाडूंना न्याय देतात त्यामुळे प्रत्येक राज्यातील लोकांना संधी दिली पाहिजे. 
- दत्तात्रय जाधव - सोंडोलीकर 
कुस्ती संघटक- अभ्यासक 


 

No comments:

Post a Comment